मनोरंजन

…म्हणून सुशांतच्या बहिणींची उच्च न्यायालयात धाव

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ड्रग्जप्रकरणी 8 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. सुशांतला त्याच्या बहिणींनी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधे दिली असा आरोप करत अभिनेत्री रिया चक्रवर्तीने त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली होती. यातच सुशांतच्या बहिणी प्रियंका सिंह आणि मितू सिंह यांनी त्यांच्यावर झालेला एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या बहिणी प्रियांका आणि मीतू यांनी उच्च न्यायालयात धाव घेत अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे.

रिया चक्रवर्तीने 7 सप्टेंबर रोजी या दोघींविरोधात सुशांतला चुकीची औषधे दिल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हा गुन्हा रद्द व्हावा, यासाठी सुशांतच्या बहिणींनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला. न्यायाधीश एस.एस.शिंदे आणि एम.एस. कर्णिक यांनी या याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी 13 ऑक्टोबर ही तारीख दिली. न्यायालयाने याचिकेवर तातडीने सुनावणीची गरज नसल्याचे नमूद करत सुनावणी 13 ऑक्टोबरला ठेवली.

प्रियंका आणि दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील डॉक्टर तरुण कुमार यांनी बंदी असलेली औषधे सुशांतला दिल्याचा आरोप रियाने आपल्या तक्रारीत केला होता. मात्र डॉक्टरने दिलेल्या औषधांच्या चिठ्ठीच्या आधारे रियाने आमच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. त्यामुळे आपल्याविरोधात गुन्हा मुंबई हायकोर्टात दाखल होऊ  शकत नाही, असा दावा प्रियांका आणि मीतूने आपल्या याचिकेत केला आहे.

रियाच्या तक्रारीत अनेक विसंगती आहेत. शिवाय तिने तक्रार दाखल करण्यासाठी अमर्यादित म्हणजेच 90 दिवसांचा विलंब केला आहे. डॉक्टरने 8 जून 2020 रोजी औषधे लिहून दिली होती. त्याच दिवशी सुशांतने रियाला घरातून जाण्यास सांगितले होते, तर रियाने तक्रार 7 सप्टेंबरला नोंदवली होती. त्यामुळे रियाने आपल्याविरोधात केलेला गुन्हा रद्द करा, अशी मागणी प्रियंका आणि मीतूने केली आहे.

याशिवाय सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयलाही आपल्याविरोधात कारवाई न करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही प्रियांका आणि मीतू यांनी केली आहे.

दरम्यान, सुशांतच्या सर्व फोरेन्सिक रिपोर्टची फेरतपासणी करत सुशांत सिंह राजपुतची हत्या झाली नाही तर सुशांतनं आत्महत्या केली आहे, असा अहवाल एम्सच्या टीमनं सीबीआयला दिला आहे. सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली असावी, या शक्यतेला एम्सच्या टीमनं नकार दिला आहे.

Comment here