मनोरंजन

….म्हणून सुशांतच्या घरी काम करणाऱ्या दीपेश सावंतने एनसीबीवर ठोकला 10 लाखांचा दावा

सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अंमली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. यातच सुशांतच्या घरात काम करणाऱ्या नोकराने एनसीबीविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.

सुशांतच्या घरात काम करणा-या दीपेश सावंतने मुंबई हायकोर्टात धाव घेत एनसीबीविरोधात 10 लाखांचा दावा ठोकला आहे. एनसीबीने आपल्याला बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवल्याचा आरोप दीपेशने केला आहे. त्याच्या या याचिकेवर येत्या 6 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

सुशांतच्या घरी काम करणाऱ्या दीपेशला ड्रग्ज प्रकरणात एनडीपीएस कायद्याअंतर्गत ताब्यात घेण्यात आलं होतं. सुशांतसाठी त्याने ड्रग्ज खरेदी केल्याचा आरोपही करण्यात आला. यानंतर काही दिवसांपूर्वीच मुंबई हायकोर्टाने त्याला जामीन दिला आहे. रिया चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडासह त्यालाही जामिनावर सोडण्यात आलं होतं. मात्र आता त्यानं एनसीबीनं आपल्याला बेकायदेशीरित्या ताब्यात ठेवल्याचा आरोप केला आहे. मुंबई हायकोर्टात त्याने याचिका दाखल करत 10 लाख रुपयांची भरपाई मागितली आहे.

आपल्या याचिकेत दीपेशनं एनसीबीवर अनेक आरोप लावले आहे. एनसीबीने आपल्या रेकॉर्डमध्ये त्याला 5 सप्टेंबरला अटक केल्याचे म्हटले आहे, मात्र आपल्याला 4 सप्टेंबरलाच रात्री दहा वाजता अटक करण्यात आली होती. त्यानंतर आपल्याला एनसीबीने स्वत:कडे ठेवले. 6 सप्टेंबरला दुपारी दीड वाजता आपल्याला कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर 9 सप्टेंबरपर्यंत एनसीबीच्या रिमांडमध्ये पाठवण्यात आले, असा दावा त्याने केला आहे.

नियमानुसार आपल्याला अटकेनंतर 24 तासांच्या आत कोर्टात हजर करावं लागतं. मात्र आपल्याला 36 तासांपेक्षा अधिक वेळानंतर हजर करण्यात आलं. हे सुप्रीम कोर्टाच्या गाइडलाइन्स आणि संविधानच्या कलम 22 चं उल्लंघन आहे, असं दीपेशनं याचिकेत म्हटलं आहे. या याचिकेवर मुंबई हायकोर्टात 6 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

दरम्यान याचिकाकर्त्याला 5 सप्टेंबरला रात्री 8 वाजता अटक करण्यात आली. मात्र लगेच अटकेची सूचना देण्यात आली नव्हती. 6 सप्टेंबरला सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी त्याला भावाला फोन करण्याची परवानगीही देण्यात आली होती, असंही एनसीबीने सांगितलं.

Comment here