अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येस बरेच दिवस झाले असले तरी त्या प्रकरणाचा तपास अद्याप सुरूच आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडून केला जात असून सुशांतच्या कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांपाठोपाठ सीबीआयच्या तपासावरही नाराजी व्यक्त केली आहे.
सुशांतचे कुटुंबीय तपासावर नाराज असल्याचा दावा सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी केला आहे. सुशांतचे वडील के.के. सिंह यांचे वकील विकास सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सुशांतचे कुटुंबीय सीबीआयच्या तपासावर नाराज असल्याचं म्हटलं आहे. ‘ज्या प्रकारे सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्यावरून सुशांतच्या कुटुंबीयांना असं वाटतंय की यातून सत्य बाहेर येणार नाही. एनसीबीनंही मुंबई पोलिसांसारखच सुरू केलं आहे. एका एका कलाकाराला बोलवलं जात आहे. हा सगळा तपास मुंबई पोलिसांच्या तपासाप्रमाणेच सुरू आहे. यात सुशांतचं प्रकरण पाठीमागे पडलं आहे,’ असं विकास सिंह म्हणाले.
सुशांतच्या कुटुंबीयांना वाटत की, या प्रकरणाचा तपास वेगळा दिशेनं व्हायला हवा. यात सगळं लक्ष ड्रग्ज प्रकरणावर केंद्रित केलं गेलं आहे. एम्सच्या डॉक्टरांनी मला सांगितलं की, सुशांतचा मृत्यू गळा दाबल्यानं झाला आहे. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं सुरू नाहीये. या तपासावर मी नाखुश आहे. हे प्रकरण कोणत्या दिशेनं जात आहे माहिती नाही. आम्ही हताश आहोत. या प्रकरणात आतापर्यंत काय आढळून आलं, यासंदर्भात सीबीआयनं एकदाही माहिती दिलेली नाही, असं विकास सिंह म्हणाले.
दरम्यान, ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि सिमोन खंबाटा यांच्यासह सात जणांना समन्स बजावले आहे. आज, 26 सप्टेंबर रोजी दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चौकशी करणार आहे. ड्रग्सबाबत चर्चा करणारी काही व्हॉट्सअॅप चॅट एजन्सी रडारवर आहे. दीपिक पादुकोणची व्यवस्थापक करिश्मा प्रकाश आणि “डी” यांच्यात हे व्हॉट्सअॅप चॅट झाले आहेत, असं सूत्रांनी सांगितले. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूच्या अंमली पदार्थांच्या कनेक्शननंतर बॉलिवूडमधील अनेक मंडळींची नावं यात समोर आली आहेत.
Comment here
You must be logged in to post a comment.