मनोरंजन

सुशांत सिंहची आत्महत्याच, एम्सच्या रिपोर्टवर सुशांतच्या बहिणीची प्रतिक्रिया

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला जवळपास तीन महिने उलटले असून या प्रकरणी दर दिवशी नवीन खुलासे समोर येत आहे. सुशांत सिंहचा मृत्यू ही हत्या की आत्महत्या यावर अनेक दावे-प्रतिदावे केले जात होते. त्याचा मृत्यू गळफासामुळे झाला की विषप्रयोगामुळे झाला, यासंबधीचे अनेक आरोप-प्रत्यारोप सुरु होते. मात्र आता या सर्व गोष्टींना पूर्णविराम देणारा एक अहवाल समोर आला आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसंदर्भात दिल्लीच्या एम्सच्या डॉक्टरांच्या एका समितीने एक अहवाल दिला आहे. या अहवालानुसार सुशांत सिंह राजपूतची हत्या नसून आत्महत्या केली आहे. असं स्पष्ट करण्यात आलं आहे. या रिपोर्टवर सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ती हिने प्रतिक्रिया दिली आहे.

‘आम्ही जिंकू’ हे दोन शब्द ट्विट करुन तिने सुशांतला न्याय देण्यासाठी सुरु असलेल्या प्रक्रियेवर विश्वास व्यक्त केला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

 

हा रिपोर्ट एम्सच्या पॅनेलने सीबीआयकडे सुपूर्द केला आहे ज्याचा सीबीआय अभ्यास करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एम्सच्या फॉरेंसिक पॅनेलने सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी त्यांच्याकडून तपास पूर्ण केला आहे. इतकेच नाही तर सीबीआयला आपली वैद्यकीय आणि कायदेशीर मत देऊन फाइल बंद केली आहे. त्यानंतर आता सीबीआय एम्सच्या रिपोर्टसोबत त्यांच्या तपास जुळवून या प्रकरणाचा निष्कर्ष काढण्यात जुंपली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. आता या प्रकरणात सीबीआय काय निष्कर्ष काढते, याकडे सगळ्यांचे लक्ष वेधून राहिले आहे.

Comment here