मनोरंजन

रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार, वकिलांनी दिली माहिती

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ड्रग्ज कनेक्शनबाबत तपास करत आहे. ड्रग अँगल समोर आल्यानंतर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीने रविवारी सकाळी रिया चक्रवर्तीला समन्स बजावत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. रियाविरुद्ध आणखीही काही ठोस पुरावे एनसीबीच्या हाती लागले आहेत. यामुळे सुशांतप्रकरणी रियाला अटक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता रिया अटकेसाठी तयार असल्याची माहिती रियाचे वकील सतीश माने शिंदे यांनी दिली.

सुशांत प्रकरणात रिया आणि तिच्या कुटुंबाचं प्रतिनिधित्व करणारे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले की या प्रकरणात रिया चक्रवर्ती स्वतःहून अटक होण्यास तयार आहे.  रियाच्या वकिलांनी सांगितलं की, ‘रिया चक्रवर्ती अटक होण्यास तयार आहे. कारण तिच्याबद्दल चांगल- वाईट बोलून तिच्यावर लक्ष्य केलं जात आहे. एखाद्यावर प्रेम करणं जर गुन्हा असेल तर रिया याची शिक्षा भोगायला तयार आहे. निर्दोष असल्यामुळेच तिने आतापर्यंत बिहार पोलीस, सीबीआय, ईडी किंवा एनसीबीने लावलेल्या खटल्यांवर अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी कोणत्याही न्यायालयात गेली नाही.’

 

सुशांत सिंह प्रकरणातील ड्रग्ज अँगलवर तपास करण्यासाठी रियाची कसून चौकशी होणार आहे. स्वतः चौकशीसाठी येणार की आमच्यासोबत असा पर्याय एनसीबीने रियाला दिला होता, त्यानंतर तिने स्वतः हजर होऊ असं सांगितलं. मुंबई पोलिसांच्या बंदोबस्तात रिया काल सकाळी 11 वाजताच्या सुमारास एनसीबी कार्यालयात रवाना झाली.

रिया चक्रवर्तीवर ड्रग्सचं सेवन करणे, ड्रग्सची वाहतूक करणे आणि शौविकच्या माध्यमातून ड्रग्स मागवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. या प्रकरणामध्ये आतापर्यंत सात लोकांना अटक करण्यात आली आहे. यात अप्पा लखानी आणि करण अरोडा यांना जामीनही मिळाला आहे. तर जैद विलात्रा आणि बासित परिहार, शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा यांना 9 सप्टेंबर पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

रिया आणि शोविकच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये बड्स आणि डब्ज या ड्रग्ज तस्करीत वापरल्या जाणाऱ्या सांकेतिक शब्दांचा वापर केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच एनसीबीने यांच्याभोवतीचा फास आवळला आहे.

Comment here