मनोरंजन

रिया चक्रवर्ती शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याच्या संपर्कात होती, सुशांतच्या मित्राचा खुलासा

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण कमालीचं गुंतागुंतीचं झालं आहे. एकीकडे अनेकांच्या जबान्या घेतल्यावर सीबीआय आपल्या शेवटच्या निर्णयापर्यंत पोहोचलं असतानाच अनेक नव्या साक्षीदारांमुळे या शेवटच्या निर्णयाआधी ही केस पुरती नवी वळणं घेताना दिसू लागली आहे. अशातच आता सुशांतचा मित्र सुनील शुक्ला याने सुशांत प्रकरणी महत्वाचा खुलासा केला आहे.

सुशांतचा जवळचा मित्र सुनील शुक्लाने गंभीर आरोप करत रिया चक्रवर्तीचे शिवसेनेसोबत असलेल्या कनेक्शनचा तपास करण्याची मागणी केली आहे. सुशांत प्रकरणात शिवसेनेचा एक नेता सामील असल्याचे सुद्धा बोलले जात होते. अशातच आता सुशांतचा जवळचा मित्र सुनील शुक्लाने रिया चक्रवर्ती शिवसेनेच्या एका मंत्र्याच्या संपर्कात होती, असा दावा केला आहे.

रिया चक्रवर्तीला लोणावळा येथील पवना लेक शेजारी जमीन खरेदी करायची होती. ही जमीन महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या क्षेत्रात येते. यामुळे ही जमीन खरेदी करण्यासाठी रिया चक्रवर्ती शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्या संपर्कात होती, असा खुलासा सुनीलनं केला आहे.

सुनील शुक्लाने दिलेल्या माहितीनुसार, लोणावळ्यातील जमीन खरेदी करण्यासाठी रियाने संजय राठोड यांच्याशी बातचीत केली होती. मात्र, त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आले. त्यामुळे ही डील होऊ शकली नाही. याप्रकरणी सीबीआयने तपास करावा, अशी मागणी सुनील शुक्लाने केली आहे. अद्याप शिवसेना मंत्री संजय राठोड यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, सुनीलने दिलेल्या माहितीत तथ्य आढळल्यास रियाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसंदर्भात दिल्लीच्या एम्सच्या डॉक्टरांच्या एका समितीने एक अहवाल दिला आहे. या अहवालानुसार सुशांत सिंग राजपूतची हत्या नसून आत्महत्या केली आहे. असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Comment here