सुशांत सिंह राजपूत प्रकरणी ड्रग्स अँगलचा तपास करणार्या एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि शोविक चक्रवर्ती यांना अटक केली आहे. त्यानंतर रिया आणि तिचा भाऊ शोविकने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, रियाच्या जामिन याचिकेवर सुनावणी सुरू असताना मुंबई उच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे.
रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि इतरांच्या जामीन अर्जावर मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. सुनावणीदरम्यान, एनसीबीने रिया आणि शोविकच्या जामिनाला विरोध केला. एनसीबीच्या मते, रिया आणि शोविक दोघे बाहेर आले तर त्याचा तपासावर परिणाम होऊ शकतो. रिया ही ड्रग्सच्या खरेदी आणि वित्तपुरवठ्यात सहभागी होती, अशी माहितीदेखील यावेली एनसीबीने न्यायालयासमोर दिली.
आतापर्यंत अटक केलेले सर्वजण हे एकमेकांशी संबंधित आहेत आणि हे सिंडिकेट आहे. प्रत्येकजण नेहमी ड्रग्ज खरेदी करत होता, असं नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह म्हणाले. याआधी अनिल सिंह यांनी रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती आणि इतरांच्या जामीन अर्जाला विरोध केला. हे प्रकरण सुशांत सिंह राजपूतशी संबंधित नाही, असं ते म्हणाले.
अंमलीपदार्थाचे सेवन करणे किती घातक ठरू शकते, हा संदेश समाजात विशेषत: देशातील तरुणांमध्ये जायला हवा, असा दावाही एनसीबीने रियासह अन्य आरोपींची याचिका फेटाळण्याची मागणी करताना केला. अंमलीपदार्थांचा गुन्हा हा खून वा सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्य़ांपेक्षा गंभीर आहे. कुटुंबातील एकाने अंमलीपदार्थाचे सेवन केल्याने संपूर्ण कुटुंब आणि परिणामी समाज उद्ध्वस्त होतो. त्यामुळेच तरुणांप्रती सहानुभूती असायला हवी, हे मान्य केले तरी अंमलीपदार्थांचे सेवन, उत्पादन, त्याची तस्करी करणाऱ्यांना शिक्षा व्हायलाच हवी, असेही सिंह यांनी रिया आणि अन्य आरोपींना जामीन नाकारण्याची मागणी करताना स्पष्ट केले.
Comment here
You must be logged in to post a comment.