मनोरंजनराजकारण

कंगना हिमाचलची, सुशांत बिहारचा पण मुद्दाम महाराष्ट्राची बदनामी करण्याचे काम सुरू आहे

जगभरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाच्या संकटामुळे अनेक लोक हतबल झाले असून अनेकांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातच सुशांत आणि कंगणाच्या मुद्यांनी महाराष्ट्राची बदनामी होत असल्याचं वक्तव्य राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.

महाविकास आघाडीचे सरकार मजबूत असून ते पाच वर्ष टिकणार असल्याने अस्वस्थ झालेले भाजप नेते कार्यकर्त्यांना उचकवण्याचा प्रयत्न करत आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचे भाजप राजकारण करत आहे. सुशांत बिहारचा तर कंगना हिमाचलची पण मुद्दाम महाराष्ट्राची बदनामी करण्याचे काम सुरू आहे, अशी टिका राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथील शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषदेत केली.

मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले की, फडणवीस यांनी मुंबईच्या बाहेर येऊन राज्याच्या हिताचा विचार करावा. ज्या कंगनाने मुंबईची बदनामी केली त्याला खतपाणी घालण्याचे काम भाजप करत आहे. राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना सुशांत सिंहच्या आत्महत्येवर राजकारण सुरु आहे.

कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रशासन पूर्ण ताकदीने प्रयत्न करीत आहे. मात्र यामध्ये नागरिकांचाही सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना चालू आहेत. तसेच जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या भागात कोरोना आटोक्यात आला आहे. त्या भागातील डॉक्टरांना कोल्हापुरात पाचारण करणार असल्याचे ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी सांगीतले.

दरम्यान कोविड-19 उपचारात रुग्णांसाठी अत्यावश्यक अशा ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार या वाहनांना रुग्णवाहिकेसारखा दर्जा देण्याची अधिसूचना गृह विभागाने आज जारी केली आहे. त्यामुळे आता वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या या वाहनांवर सायरन असणार. तसेच या वाहनांची वाहतूक रोखता येणार नाही.

Comment here