मनोरंजन

रिया चक्रवर्तीची तब्बल एक महिन्यानंतर भायखळा तुरुंगातून सुटका

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अमली पदार्थ पुरवठा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर सगळ्यांचं पून्हा लक्ष केंद्रीत झालं आहे. सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या रिया चक्रवर्तीची अखेर बुधवारी हायकोर्टाने जामिनावर सुटका केली. गेल्या एक महिन्यापासून रिया भायखळा येथील तुरुंगात होती.

हमीदारांची त्वरित व्यवस्था होऊ शकणार नसल्याने सध्या रोखीच्या जामिनावर सुटका होण्याची मुभा द्यावी, अशी विनंती रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी केली. त्याप्रमाणे न्यायमूर्तींनी तशी मुभा देऊन एक लाख रुपयांच्या रोख जामिनावर जामीन मंजूर केला. मात्र यावेळी रियाला पासपोर्ट जमा करण्याचा आदेश देण्यात आला असून पोलिसांच्या परवानगीशिवाय मुंबईबाहेर प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. रियासोबत सुशांतचे कर्मचारी सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.

रियाची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तसंच अमलीपदार्थांचा पुरवठा करणाऱ्या साखळीतही ती सहभागी असल्याचं दिसत नाही. रिया ड्रग्ज सिडिकेटची सक्रिय सदस्य आहे याबाबत एनसीबी पुरावे देऊ न शकल्यानं रियाला जामीन मिळाला. एनसीबीनं ज्या कलमांतर्गत कारवाई केली ती कलम कोर्टात एनसीबी सिद्ध करू शकले नाहीत.

रियासोबत तिचा भाऊ शोविकलाही अटक झाली होती. कोर्टाने शोविकचा जामीन अर्ज फेटाळला आहे. शोविकसोबत अब्दुल बसितचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे.

Comment here