मनोरंजन

‘माझ्या मुलीप्रमाणेच सुशांतलाही मारलं गेलं’, अभिनेत्री जियाच्या आईने केली सीबीआय चौकशीची मागणी

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी वेगवेगळ्या गोष्टींचा खुलासा होताना दिसत आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी कोण करणार- मुंबई पोलीस, बिहार पोलीस की सीबीआय, याबाबत देशाचे सर्वोच्च न्यायालय निर्णय देऊ शकतं. यातच बॉलिवूड अभिनेत्री जिया खानची आई रबियानं आपल्या मुलीच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

अभिनेत्री जिया खानची आई रबियाचं मत आहे की, ज्याप्रमाणे त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला, आत्महत्या दाखवली गेली त्याचप्रमाणे सुशांतच्या मृत्यूबाबतही घडले आहे. माझ्या मुलीलाही आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आलं होतं. एक पोस्ट शेअर करत त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.  सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूला सुसाइड म्हटलं गेलं. त्याचप्रमाणे माझ्या मुलीचीही हत्या अशाच प्रकारे करण्यात आली आहे. त्यामुळे सीबीआयने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी. नाहीतर पोलिसांवर असलेल्या राजकीय दबावामुळे सत्य कधीच उघड होणार नाही.

जिया खानप्रमाणेच सुशांत सिंग यांनाही मारण्यात आलं आहे. सुशांत आणि जीया दोघांनाही प्रेमात फसवलं गेलं. दोघानाही पैशासाठी वापरलं गेलं होतं आणि कौटुंबापासून दूर ठेवलं गेलं. जिया आणि सुशांत दोघेही मानसिकरित्या दुर्बल झाले होते. काम नसल्यामुळे ते निराश झाले होते. झिया खान आणि सुशांतच्या मृत्यूचे धागेदोरे बॉलिवूडच्या माफिया आणि नेत्यांशी संबंधित आहेत. त्यामुळेच राजकीय दबावामुळे पोलिस सत्य समोर आणू शकत नाहीयेत. सीबीआयने या प्रकरणांच्या तळाशी जाऊन या गुन्हेगारांचा शोध घ्यावा. अन्यथा अशा अनेक घटना पुढे घडू शकतात. जिया-सुशांत सारख्या इतर निष्पाप लोकांचा यात नाहक बळी जाऊ शकतो, असं जीयाच्या आईनं म्हटलं आहे.

जिया खानने सात वर्षांपूर्वी 3 जून 2013 रोजी आपल्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी सीबीआयने जिया खानच्या मृत्यूची चौकशी केली असून ही चौकशी अद्याप सुरू आहे, यासाठी जीयाचा बॅायफ्रेंड सूरज पांचोली अनेक वेळा सुनावणीस गेला आहे.

Comment here